Home Uncategorized सावद्यात थरकाप ! : वीज खांबावर काम करताना 3 कामगारांना जोरदार धक्का,...

सावद्यात थरकाप ! : वीज खांबावर काम करताना 3 कामगारांना जोरदार धक्का, प्रकृती गंभीर


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा शहरात आज बुधवारी दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. शहरातील स्टेशन रोडवरील १३२ केव्हीए (132 KV) क्षमतेच्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या खांबावर देखभाल-दुरुस्तीचे काम करत असताना तीन परप्रांतीय कामगारांना विजेचा जोरदार धक्का लागला. हा धक्का इतका भीषण होता की, तिन्ही कामगार खांबावरून खाली कोसळले. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, सावदा येथील स्टेशन रोड परिसरात महावितरण कंपनीच्या १३२ केव्हीए उपकेंद्रांतर्गत असलेल्या विद्युत खांबावर बुधवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास काम सुरू होते. हे काम ठेकेदारी पद्धतीने करण्यात येत असून, त्यासाठी बिहार राज्यातील काही कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. हे कामगार खांबावर चढून तांत्रिक काम करत असताना अचानक विद्युत तारांमध्ये प्रवाहित असलेल्या विजेचा त्यांना संपर्क झाला. क्षणात तिघांनाही विजेचा प्रचंड मोठा झटका बसला आणि ते उंचावरून जमिनीवर फेकले गेल्याने ते गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र जखमांचे स्वरूप गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) हलवण्यात आले आहे. जखमी कामगारांची नावे अद्याप समजू शकली नाहीत, मात्र ते सर्व मूळचे बिहार राज्यातील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


Protected Content

Play sound