
सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात उद्या मंगळवार ८ जुलै रोजी ‘मियावाकी घनवन प्रकल्प वृक्षारोपण समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय सेवा योजना, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी दिली आहे.

या समारंभाचे अध्यक्षस्थान माजी आमदार शिरीषदादा चौधरी, अध्यक्ष हे भूषवतील. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी यांच्या शुभहस्ते या वृक्षारोपण समारंभाचे उद्घाटन होईल.
याप्रसंगी माजी व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, एनसीसीचे संचालक सचिन नांद्रे, तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर चौधरी, उपाध्यक्ष श्री. मिलिंद वाघुळदे, चेअरमन लीलाधर चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा. किशोर चौधरी, सचिव प्रा. मुरलीधर फिरके, सहसचिव प्रा. नंदकुमार भंगाळे, सदस्य प्रा. मधुकर पाटील, ओंकार सराफ, संजय चौधरी, माजी प्राचार्य डॉ. शशिकांत पाटील, हरीष वसंतदाणी यांच्यासह प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य डॉ. राजेश चौधरी, प्राचार्य डॉ. रवींद्र एल. चौधरी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
स्वर्गीय लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी सुरू केलेल्या ‘हिरवा सातपुडा अभियान’ ला यशस्वीपणे पुढे नेत, त्यांच्या संकल्पनेतील भारतीय प्रजातीच्या औषधी वनस्पती आणि वृक्षांचे सातपुड्याच्या जंगलात संवर्धन व्हावे या उद्देशानेच महाविद्यालयात हा ‘मियावाकी घनवन प्रकल्प’ राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाला विद्यापीठासह हिरवांकुर फाउंडेशन, नाशिक यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. यापूर्वी राबवण्यात आलेल्या मियावाकी घनवन प्रकल्पामुळे परिसरातील तापमानात लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे, याचा फायदा परिसरातील नागरिकांनाही व्हावा हा या उपक्रमामागील उदात्त हेतू आहे.
या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळ अध्यक्ष श्री. शिरीषदादा चौधरी आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभत असून, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी अथक परिश्रम घेत आहेत.



