फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथून जवळच असणार्या सावदा येथील नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे.
वृक्षारोपण मोहिमेच्या अंतर्गत लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. अनिता येवले व उपनगराध्यक्षा शबाना मुराद तडवी यांच्याहस्ते विविध झाडांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी गटनेते अजय भारंबे, नगरसेविका लीना चौधरी, रंजना भारंबे, मिनाक्षी कोल्हे, विजया जावळे, वरिष्ठ अभियंता धनराज राणे, आरोग्य निरिक्षक महेश चौधरी, पत्रकार राकेशकुमार पाटील, न. पा. कर्मचारी आहुजा, विमलेश जैन, सतीश पाटील, विजय राणे, महेश पाटील, संजय लोखंडे, रवी लोखंडे, शेखर राणे, श्री उन्हाळे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थितांनी स्वतः खड्डे खोदून, ५० वृक्ष रोपे लावून त्यांना पाणी दिले. या मोहिमेच्या अंतर्गत नगरपरिषदेतर्फे ४००० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. येथे लावलेली रोपे ही न.पा.ची स्व-संवर्धित रोपे होती. मात्र आगामी काळातील रोपे ही पाल येथील वृक्ष संजीवनी नर्सरीतून मिळणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.