जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बीएसएनएलच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जळगाव येथील बीएसएनएल भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी केक कापून करण्यात आली, त्यानंतर, पर्यावरण रक्षणाचा संदेश देत बीएसएनएल भवनच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

या रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधून जळगाव शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बीएसएनएल भवन येथून निघालेली ही रॅली नवीन बस स्थानक, स्वतंत्र चौक मार्गे फिरून परत आली. या रॅलीत मोठ्या संख्येने बीएसएनएलचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाला आमदार राजू मामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी बीएसएनएलच्या उत्कृष्ट कार्याबद्दल कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव आमदार भोळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी खा. स्मिताताई वाघ आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचनही करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळी ऊर्जा मिळाली.
सकाळच्या सत्रानंतर दुपारच्या सत्रात सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरालाही कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केक, रॅली, वृक्षारोपण आणि रक्तदान अशा विविध उपक्रमांनी बीएसएनएलचा रौप्यमहोत्सव अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.



