जळगाव प्रतिनिधी । गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बचत गटांच्या माध्यमांतून ग्रामीण भागातील नागरीकांना आर्थीक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच वृक्षसंवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून एरंडोल तालुक्यातील खर्ची खु. येथे वृक्षारोपण करण्यात आले. पहिल्या वर्षी दहा विविध जातीच्या झाडांच्या रोपांची लागवड व संगोपन करण्यात आले. तर दुसऱ्या वर्षी १५ व यावर्षी ३० रोपांची लागवड केले. यापैकी ८० टक्के वृक्ष जगले आहेत.
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली ओम साईराम पुरूष बचत गटाकडुन १५ निंबाचे व १५ करंज चे असे ३० रोपांची खर्ची खु. येथील अंगणवाडी, राम मंदीर परिसर व रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली. एवढेच नाही तर ते जबाबदारीने जगविण्याचा ध्यास युवकांनी यावेळी घेतला. गटाचा उद्देश निव्वळ बचत करणे नसून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून आहे. यातून सामाजीक बांधीलकी जोपासण्याचा संदेश देण्यात आला. वृक्ष लागवडीत ओम साई गटाच्या सदस्यांसोबत काही ग्रामस्थांनीसुद्धा योगदान दिले. दरवर्षी हा उपक्रम गटाच्या निव्वळ नफ्यातुन रोपे आणी ट्रिगार्ड खरेदी करून राबवीला जातो. या प्रसंगी दिलीप मराठे, किशोर माळी, किरण पाटील, सुनील मराठे, महेंद्र जगताप, अविनाश मराठे, भगत भिल गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सुर्यवंशी व मयुर गीरासे यांनी परिश्रम घेतले.