

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसाळा येथे गौण खनिज वाहतूकदारांनी अक्षरशः कहर केला आहे. गौण खनिजाच्या (वाळू) अवैध वाहतुकीसाठी या माफियांनी चक्क शिरसाळा येथील पाझर तलावाची भिंत फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कृत्यामुळे पाझर तलावातील पाणीसाठा कमी होण्याची भीती असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
शिरसाळा येथील हा पाझर तलाव वन्य प्राणी आणि गावातील गुरेढोरांसाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. तलावाची भिंत फोडल्यामुळे पाणी वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उन्हाळ्यापूर्वीच पाण्याची समस्या वाढणार असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत.
गौण खनिज वाहतूकदारांनी केलेल्या या गंभीर नुकसानीबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गौण खनिज माफियांवर कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याने त्यांच्या मनमानी कारभाराला ऊत आला आहे. या गंभीर प्रकाराची तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पाझर तलावाचे नुकसान करणाऱ्या आणि नैसर्गिक जलस्रोताला धोका निर्माण करणाऱ्या गौण खनिज माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली जात आहे.



