जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरात खंडणीच्या मागणीवरून एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला धमकी दिल्याची घटना गुरूवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजात घडली आहे. निर्भय ऊर्फ गोटया रविंद्र पाटील याने ८०० रुपयांच्या वादातून ट्रान्सपोर्ट चालक आणि त्याच्या मुलाला शिवीगाळ व धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत आरोपीला ताब्यात घेतले असून याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील दत्तात्रेय नगर येथील रहिवासी अशोक डिगंबर पाटील (वय-५९) यांचा ओम साईराम ट्रान्सपोर्ट हा व्यवसाय आहे. ते आणि त्यांचा मुलगा राहुल अशोक पाटील (वय-३५) गेल्या सहा वर्षांपासून बळीराम पेठ भागातील लहान शनिमंदिराजवळ कार्यालय चालवत आहेत. परिसरातील निर्भय ऊर्फ गोटया रविंद्र पाटील हा नेहमी त्यांच्या कार्यालयात येऊन पैशांची मागणी करत असल्याचे सांगण्यात आले.
बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता गोटया पाटील हा ट्रान्सपोर्ट कार्यालयात आला आणि “शिवजयंतीसाठी आम्हाला ऑटो रिक्षा करून द्या” अशी मागणी केली. त्यामुळे अशोक पाटील यांनी ओळखीच्या चंद्रशेखर सुरेश कोळी यांची ऑटोरिक्षा भाड्याने मिळवून दिली. मात्र, ८०० रुपयांचे भाडे देण्यास नकार दिल्याने गोटया संतप्त झाला व पाटील यांना शिवीगाळ करून निघून गेला.
गुरूवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजात गोटया पाटील पुन्हा कार्यालयासमोर आला आणि ट्रान्सपोर्ट ऑफिस समोरील लोखंडी जाळी उचलून फेकून दिली. तसेच “येथे काम करायचे नाही” असा दम दिला. यानंतर सकाळी ११ वाजता अशोक पाटील कार्यालयात पोहोचले असता, त्यांनी गोटयाला जाब विचारला. त्यावेळी गोटयाने पुन्हा शिवीगाळ करत धमकी दिली आणि लोखंडी सुरा घेऊन अंगावर धावून गेला. याबाबत पाटील यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना माहिती दिली. तातडीने पोलीस हवालदार उमेश भांडारकर घटनास्थळी पोहोचले व त्यांनी संशयित आरोपी गोट्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.