जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक करण्यात आली असून, लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सुधारित प्रणालीअंतर्गत बँक मंजुरी स्तरावर “Reject for Incomplete Documents” अर्थात अपूर्ण कागदपत्रांमुळे Reject स्थितीत असलेली प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर पाहता येणार असून, अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता स्वतः ऑनलाईन अपलोड करून करता येणार आहे. यामुळे कार्यालयीन फेऱ्यांची गरज भासणार नाही. आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केल्यानंतर संबंधित प्रकरण “Scrutiny” स्तरावर जाईल व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर “Submit” पर्याय उपलब्ध होईल. त्यानंतर प्रकरण मुख्यालयाकडे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येईल.

तसेच, व्याज परतावा क्लेम प्रक्रियेदरम्यान “Hold” स्थितीत असलेली प्रकरणे लाभार्थ्यांना कारणासहित लॉगिनवर दिसणार आहेत. अशा प्रकरणांमधील त्रुटी १५ दिवसांच्या आत दूर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित कागदपत्रे जिल्हा समन्वयकांकडे सादर केल्यानंतर प्राथमिक व विभागीय तपासणी पूर्ण होऊन प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी मुख्यालयाकडे पाठवले जाईल.
सुधारित प्रणालीमध्ये क्लेम “Sent For CAFO” स्तरावर पोहोचताच पुढील क्लेम सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी प्रतीक्षा न करता या सुविधेचा लाभ घ्यावा.
दरम्यान, काही प्रकरणांमध्ये संपर्क क्रमांक, बँक तपशील किंवा कागदपत्रांमधील विसंगती आढळल्याने ती “Block” करण्यात आली होती. बनावट कागदपत्रांच्या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित प्रकरणांवर फौजदारी कार्यवाही सुरू आहे. अशा लाभार्थ्यांनी आवश्यक दुरुस्त्या करून मूळ कागदपत्रांसह अर्ज जिल्हा समन्वयकांकडे सादर करावा.
महामंडळाने सर्व लाभार्थ्यांना आपल्या लॉगिनवर प्रकरणांची स्थिती तपासून आवश्यक कागदपत्रांची त्वरित पूर्तता करण्याचे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत वेब प्रणालीद्वारेच अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक निखिल आखडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.



