साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जोरदार वादळी वाऱ्यामुळे भुसावळ तालुक्यातील वांजोळा शिवारातील शेतातील झोपडी अंगावर पडल्याने एका ५५ वर्षीय शेतमजूराचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी ६ जून रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गिरधर बजरंग भिल (वय ५५ रा. साकेगाव ता. भुसावळ) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील किशोर देवराम सावळे यांच्या वांजोळा शिवारातील शेतात गिरधर भिल हा झोपडीत राहत होता. तिथेच शेतातील काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. सोमवारी ३ जूनच्या रात्री अचानक वारा वादळ व पाऊस सुरू झाला. या वादळी पावसाने झोपडी पडून त्याखाली दबल्याने गिरधर भिल यांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना तीन दिवसानंतर गुरूवारी ६ जून रोजी पहाटे ५ वाजता समोर आली. त्यानुसार भुसावळ तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच शेतात नातेवाइकांनी आक्रोश केला. भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.