जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धानोरा शिवारातून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई करत वाहन जप्त केले आहे. ही कारवाई सोमवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता करण्यात आली. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालक व मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गिरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा करून धानोरा शिवारातून अवैधरित्या ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सोमवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता धानोरा शिवारातील गावाच्या बाहेर स्मशानभूमीजवळ पोलिसांनी कारवाई करत विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पकडले. यावेळी पोलिसांना पाहून ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला होता. पोलिसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भूषण सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दुपारी ४ वाजता ट्रॅक्टरवरील अनोळखी चालक व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल मोरे करीत आहे.