जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाघ नगर परिसरातून ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या चालकावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने गुरूवारी १९ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता कारवाई केली असून चालकाला अटक करण्यात आली. याप्रकरणी शुक्रवारी २० डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव शहरातील वाघ नगर परिसरामधून गिरणा नदीतून वाळूचा उपसा करून वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने गुरुवारी १९ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता वाघ नगर स्टॉप येथे ट्रॅक्टर क्रमांक (एमएच २९ व्ही ११०७) मधून वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर वाळू पकडले. दरम्यान चालक विकास प्यारसिंग बारेला (वय-२०, रा. शिरवेल जिल्हा खरगोन मध्यप्रदेश ह.मु. रायसोनी नगर) याला वाळू वाहतुकीबाबत परवाना विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार त्याला अटक केली असून वाळूने भरलेले ट्रॅक्टर हे जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गोपाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विकास प्यारसिंग बारेला याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे करीत आहे.