अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तहसील कार्यालयातून चोरीस गेलेल्या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने केवळ २४ तासांत उघडकीस आणला आहे. आरोपीला अटक करून चोरीस गेलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त करण्यात आली आहे. कमलेश उर्फ कल्पेश भिल (वय २०, रा. मोहाडी, ता. जि. धुळे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
अवैध वाळू वाहतूक प्रकरणात लक्ष्मण शांतीलाल भिल याचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह अमळनेर महसूल विभागाने तहसील कार्यालयात जप्त करून लावले होते. मात्र, १४ जानेवारी २०२५ रोजी अज्ञात व्यक्तीने हे ट्रॅक्टर चोरून नेले. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, चोरीस गेलेले ट्रॅक्टर हे मालकाचा लहान भाऊ, कमलेश उर्फ कल्पेश भिल (वय २०, रा. मोहाडी, ता. जि. धुळे) याने चोरले असल्याचे उघड झाले. मोहाडी गावात जाऊन पोलिसांनी कमलेश भिल याचा शोध घेतला आणि त्यास ताब्यात घेतले. विचारपूस करताना आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर, ट्रॉली, आणि अर्धा ब्रास वाळू असा एकूण १ लाख ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपासासाठी आरोपीला अमळनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस हवालदार संदीप पाटील, गोरख बागुल, प्रविण मांडोळे, आणि राहुल कोळी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.