जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील मोहाडी ते धानोरा रोडवरील नागझिरी शिवारातील रस्त्यावरून अवैधपणे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर सोमवारी 1 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता जळगाव तालुका पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील मोहाडी ते धानोरा रस्त्यावरील नागझिरी शिवारातील रस्त्यांमधून गिरणानदी पात्रातून अवैधपणे वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने सोमवारी 1 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता कारवाई करत विना क्रमांकाचे ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी दुपारी 2 वाजता पोलीस कॉन्स्टेबल धनराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक राजेंद्र बाबुराव सोनवणे रा. मोहाडी ता. जि. जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे हे करीत आहे.