रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाल अभयारण्यात निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यास येणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण असलेला झुलता पूल सध्या धोक्याच्या अवस्थेत पोहोचला आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सध्या पूल बंद ठेवण्यात आला असला, तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि वेळेवर देखभाल न झाल्यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

दरवर्षी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानसारख्या परराज्यातूनही पर्यटक पाल अभयारण्यात भेट देतात. जंगल सफारी, हिरव्यागार वनराईतून भटकंती आणि प्राणी-पक्ष्यांचे दर्शन हे जसे आकर्षणाचे केंद्र आहे, तसेच पुलावरून चालताना मिळणारा रोमांचकारी अनुभव हा या ठिकाणचा खास भाग मानला जातो. मात्र, सध्या झुलत्या पुलाच्या दोन्ही टोकांवरील लाकडी फळ्या मोडकळीस आल्या असून त्यांवर चालणे धोक्याचे झाले आहे. लोखंडी तारा गंजल्यामुळे पूल अधिकच असुरक्षित बनला आहे.

वन विभागाने अलीकडेच कोट्यवधी रुपये खर्च करून अभयारण्यात जंगल सफारी प्रकल्प सुरू केला आहे, परंतु तुलनेत अल्प खर्चात दुरुस्ती करता येणाऱ्या झुलत्या पुलाकडे मात्र दुर्लक्ष केल्याने अनेक पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत. काहींनी तर सोशल मीडियावर याबाबत संताप व्यक्त करत, पर्यटनस्थळांची देखभाल नियमित करण्याची गरज अधोरेखित केली आहे.
स्थानीय नागरिकांसह पर्यटकांमधून उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी या विषयात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. पुलाची दुरुस्ती न केल्यास भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाला जबाबदारीने निर्णय घेण्याची गरज आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्तेही या प्रकरणात सक्रिय झाले असून, मागील आठ–दहा वर्षांत झुलत्या पुलाच्या देखभालीसाठी किती निधी खर्च झाला, याची माहिती अधिकाराच्या माध्यमातून मागवण्याचा विचार करत आहेत. निधी असूनही कामे न होणे हा प्रशासकीय हलगर्जीपणाचा भाग मानला जात आहे.



