
सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निंभोरा येथील रहिवासी तोषल शैलेश धांडे यांनी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेत यश संपादन करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मिळविलेल्या या यशाबद्दल निंभोरा परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून तोषल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तोषल धांडे यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात सातत्यपूर्ण मेहनत घेत हे यश मिळविले आहे. त्यांचे प्राथमिक तसेच उच्च शिक्षण जळगाव येथील एम. जे. कॉलेजमध्ये झाले असून त्यांनी चार्टर्ड अकाउंटंटचा अभ्यासक्रम दिल्ली विद्यापीठातून पूर्ण केला. कठीण परिस्थितीतही ध्येयापासून विचलित न होता त्यांनी अभ्यास, नियोजन आणि अथक परिश्रमाच्या जोरावर सीए होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
तोषल धांडे यांचे वडील स्वर्गवासी असून त्यांच्या पश्चात त्यांनी शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला. निंभोरा येथील प्रगतिशील शेतकरी कुंदन धांडे व राजू धांडे यांचे ते पुतणे आहेत. कुटुंबीयांनी दिलेला भक्कम पाठिंबा आणि स्वतःची मेहनत यामुळे हे यश मिळविता आल्याची भावना तोषल यांनी व्यक्त केली.
आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना तोषल धांडे म्हणाले, “ही केवळ माझी पदवी नाही, तर माझ्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाल्याचा हा क्षण आहे. आज मिळालेले यश हे माझ्या एकट्याचे नसून माझ्या वडिलांच्या स्वप्नांचे, आईच्या पाठिंब्याचे आणि संपूर्ण कुटुंबाच्या प्रेम व आशीर्वादाचे फलित आहे. हे यश मी माझ्या कुटुंबाला आणि विशेषतः माझ्या स्वर्गीय बाबांना समर्पित करतो.”
सीए सारख्या प्रतिष्ठेच्या परीक्षेत वयाच्या २३ व्या वर्षी मिळविलेल्या या यशामुळे तोषल धांडे हे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहून सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळू शकते, हे त्यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे.
तोषल धांडे यांच्या यशामुळे निंभोरा गावासह सावदा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ आणि विविध सामाजिक स्तरातील नागरिकांकडून त्यांना पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.



