सेवा हक्क कायद्याच्या दणक्याने मिळाले टोकरे कोळी जात प्रमाणपत्र

आयुक्त चित्रा कुलकर्णी यांचे मिळाले सहकार्य

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बांभोरी येथील घरची अत्यंत गरीब परीस्थीती असलेल्या इयत्ता नववीतील विद्यार्थीनी दर्शना लिलाधर कोळी हिचे टोकरे कोळी जात प्रमाणपत्र प्रकरण एरंडोल उपविभागीय कार्यालयात तब्बल ८ महिन्यापासून प्रलंबित होते. सदर जात प्रमाणपत्र महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ चा वापर केल्यामुळे मिळाले. एजंट वा मध्यस्थ न घेता मोफत जात प्रमाणपत्र मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की बांभोरी येथील विद्यार्थीनी दर्शना लिलाधर कोळी हिचे जात प्रमाणपत्र प्रकरण उपविभागीय कार्यालय एरंडोल येथे धरणगाव येथील चेतन जाधव यांच्या इच्छाकृपा काम्पुटर सेतू केंद्रामार्फत दिनांक २५/०७/२०२४ रोजी सादर केले होते. जात प्रमाणपत्र सादर केल्या पासून साधारण ४५ दिवसात जात प्रमाणपत्रावर निर्णय घेणे अपेक्षित होते परंतु सदर कार्यालयाने त्यावर कसलाही निर्णय घेतला नाही.

सदर प्रकरणावर सेतू कार्यालयाने अर्जदाराचा फोन नंबर न टाकता स्वत:चा क्रमांक टाकला होता त्यामुळे सदर प्रकरणाची अर्जदारास कसलीच माहिती मिळत नव्हती या बाबत उपविभागीय कार्यालय एरंडोल येथे पालक लिलाधर कोळी यांनी अनेकदा चकरा मारल्या , प्रत्यक्ष मनिषकुमार गायकवाड,उपविभागीय अधिकारी यांना भेटूनही व्यवस्थीत उत्तर मिळाली नाहीत व जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे दर्शनाचे पालक लिलाधर कोळी यांनी विधीज्ञ संजय सपकाळे व ॲड रमाकांत यांच्या सहकार्याने वेळेत सेवा मिळाली नाही म्हणून महाराष्ट्र लोकसेवा हक्क २०१५ अधिनिमांर्तगत प्रथम अपिल अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्याकडे सादर केले.

सदर अपिल सुनावणीत अपिलार्थी यांना उपविभागीय कार्यालयाकडून लिखित स्वरुपात जात प्रमाणपत्राबाबत काही एक कळविलेले नव्हते तसेच जातपडताळणी कायद्यातील ४(९) नुसार म्हणणे ऐकले गेले नव्हते. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी महोदयांनी उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांना दिनांक १८/०२/२०२५ रोजीच्या आदेशान्वये १५ दिवसात पुनश्च सुनावणी घेवून गुणवत्तेनुसार निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

पुनश्च सुनावणीत लिलाधर कोळी यांनी टोकरे कोळी जमातीचे सबळ पुरावे सादर केल्यावर व पदनिर्देशित अधिका-यांनी अपिल मान्य केल्याचे पत्र दिल्यावर व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यावरही उपविभागीय कार्यालयाकडून जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होत होती. दरम्यानच्या काळात सेवा हक्क आयोग नाशिक यांचा जळगाव दौरा होता. त्यावेळी आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची संजय सपकाळे पंकज रायसिंग, युगांत जाधव, लिलाधर कोळी हयांनी भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी गजेंद्र पाटोळे निवासी जिल्हाधिकारी यांना सदर प्रकरणात लक्ष घालण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतर पाटोळे यांनी संबधीत तहसिलदार व उपविभागीय कार्यालयास आदेश दिल्या नंतर दर्शना लिलाधर कोळी हिला जात प्रमाणपत्र मिळाले. तिचे वडील लिलाधर कोळी हे रोजंदारीवर कंपनीत काम करतात. आता जात प्रमाणपत्र मिळाल्यामुळे दर्शना हिच्या स्कॉलरशीपचा प्रश्न सुटणार असून कुठलेही अतिरिक्त पैसे खर्च न करता फक्त महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांर्तगत जात प्रमाणपत्र मिळाल्यामुळे टोकरे कोळी जमात बांधवांमध्ये समाधान व्यक्त होत आहे आगामी काळात लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ वापर जमात बांधवांनी अधिकाधिक करावा असे आवाहन पंकज रायसिंग व मदन शिरसाटे यांनी केले आहे.

Protected Content