रुग्णालयांना 80 टक्के ऑक्‍सिजन पुरवू – मुख्यमंत्री

 

ठाणे- राज्य सरकारनेही आता राज्यातील रुग्णालयांना 80 टक्के ऑक्‍सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून 20 टक्के ऑक्‍सिजनचा पुरवठा उद्योगक्षेत्राच्या माध्यमातून केला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यात यापूर्वी प्रयोगशाळांची संख्या अत्यंत कमी होती ती आता साडेपाचशेपर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहितीहीं त्यांनी दिली. नव्या मुंबईतील करोना चाचणी प्रयोगशाळा आणि सहा कोविड केअर सेंटर्सचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते.

राज्यातील रुग्णालयांना जे ऑक्‍सिजन सिलिंडर्स पुरवले जाणार आहेत ते केंद्रीय पद्धतीने पुरवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी दर्जेदार व्यवस्था करण्यात आली आहे. पण तरीही या व्यवस्थेच्या विरोधात नाराजी व्यक्‍त केली जात आहे, त्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, संबंधित एजन्सीजनी आपल्या सेवेची विश्‍वासार्हता वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संपूर्ण राज्यभरात उत्तम आरोग्य यंत्रणा उभारण्याचे काम करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

राज्यातल्या मोठ्या व प्रमुख रुग्णालयांनीही गरीब रुग्णांवरील उपचाराची जबाबदारी उचलली पाहिजे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्‍त केली. करोनाच्या संबंधात जे निर्बंध किंवा उपाययोजना नागरिकांना सुचवण्यात आल्या आहेत, त्याचा कटाक्षाने अंमल करावा, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

Protected Content