सेऊल (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे जागातील 14 वे आणि भारतातले पहिले व्यक्ती ठरले आहेत. दरम्यान, पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कम ‘नमामि गंगे’ प्रकल्पाला दान करणार असल्याचे मोदींनी जाहीर केले आहे.
”सियोल शांती पुरस्कार प्राप्त होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मात्र या सन्मानाकडे मी केवळ वैयक्तिरित्या माझा माझा सन्मान म्हणून पाहत नाही तर भारतीय जनतेला कोरियाई जनतेने दिलेल्या सद्भावना आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहतो,” अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार स्वीकारल्या नंतर दिली आहे. सेऊल शांतता पुरस्कारासाठी जगभरातुन एकूण 1300 नामांकने प्राप्त झाली होती. त्यानंतर पुरस्कार कमिटीने त्यातील 100 नामांकनाबाबत गांभीर्याने विचार केला. अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या आधी हा पुरस्कार जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी प्रमुख असलेल्या बान की मून यांनाही हा पुरस्कार मिळाला होता.
नरेंद्र मोदी यांनी जनधनसारखी महत्त्वाची योजना सुरू केली होती. पुरस्कार समितीने गरीब आणि श्रीतमंत यांच्यातील अंतर कमी करण्यासाठीचे श्रेय हे मोदीनॉमिक्सला दिले. मोदींनी घेतलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर देशात टीका झाली असली तरी पुरस्कार समितीने भ्रष्टाचार रोखण्यासाठीची आश्वासक पाऊले म्हणून या निर्णयांकडे पाहिले. जागतिक सहकार्य – तसेच भारतीय पंतप्रधानांनी आपल्या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून दिलेल्या योगदानाची दखलही पुरस्कार समितीने घेतली.