भोपाळ, वृत्तसंस्था | प्री-वेडिंग फोटोशूट म्हटले की, नवरा-नवरी अगदी उत्साहात भाग घेत असतात. हे फोटो आयुष्यभर कायम स्मरणात राहावेत, असेच प्रत्येक नवरा-नवरीला वाटत असते. मात्र मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये नवऱ्यामुलांना अशा ठिकाणी आपले फोटो काढावे लागत आहेत, जे आपल्या कधीही आठवणीत राहू नयेत, असेच कुणालाही वाटेल.
याचे कारण म्हणजे मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये होणाऱ्या नवऱ्यांना आपल्या घरातील टॉयलेटमध्ये उभे राहून फोटो काढावे लागत आहेत. जर असे केले नाही, तर नवरीला मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेअंर्गत नवदांपत्याला ५१ हजार रुपयांचा निधीवर पाणी सोडावे लागणार आहे. शौचालयांच्या निर्मितीला चालना मिळावी या उद्देशाने हे बंधनकारक करण्यात आले आहे.
फोटो नाही तर लग्नही नाही
जो पर्यंत होणाऱ्या नवऱ्याच्या घरामध्ये शौचालय असणार नाही, तो पर्यंत कोणताही लाभार्थी ५१ हजारांच्या रकमेसाठी शासनाकडे केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही असा नियम करण्यात आला आहे. शासकीय अधिकारी प्रत्येकाच्या घरी जाऊन शौचालय आहे का, याची तपासणी करण्यापेक्षा होणाऱ्या नवऱ्याने शौचालयात उभे राहून काढलेल्या फोटोची मागणी करू लागले आहेत. भोपाळमध्ये एका सामूहिक विवाह कार्यक्रमात जात असलेल्या नवरदेवाने सांगितले की, नवरा शौचायलयात उभा आहे, असा फोटो असलेले विवाह दाखल्याचा जरा विचार करून पाहा कसे वाटते. जो पर्यंत मी शौचालयात उभा राहून फोटो काढत नाही, तो पर्यंत लग्न लागणार नाही असे मला सांगण्यात आले.’
प्रक्रियेत सुधारणा आवश्यक
विवाहाच्या पूर्वी ३० दिवसांमध्ये घरात शौचालय तयार करावे अशी पूर्वी अट होती, मात्र आता ही अट रद्द करण्यात आल्याचे महापालिका योजना प्रभारी सी. बी. मिश्रा यांनी सांगितले. शौचालयात उभा असलेल्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो लावणे ही चुकीची गोष्ट असल्याचे आपल्याला वाटत नसल्याचे मिश्रा यांचे म्हणणे आहे. हा फोटो विवाहाच्या आमंत्रण पत्रिकेचा भाग नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. शौचालय हा स्वच्छ भारत अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे हे मान्य आहे, मात्र ही प्रक्रिया अधिक चांगली करता येऊ शकते, असे नगरसेवक आणि काँग्रेसचे स्थानिक नेते रफीक कुरेशी यांनी म्हटले आहे.
गर्दी वाढल्याने शोधला हा उपाय
मुख्यमंत्री कन्या विवाह योजना ही आर्थिकदृष्ट्या मागासवर्गासाठी सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी १८ डिसेंबरला सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने दुसऱ्याच दिवशी या योजनेतील रकमेत वाढ करूत २८ हजारावरून ती ५१ हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर अर्जदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. याच कारणामुळे घराघरात जाऊन शौचालयांची तपासणी करणे अतिशय कठीण होऊ लागले. त्यावर उपाय म्हणूनच होणाऱ्या नवऱ्याने आपल्या शौचालयात उभे राहून फोटो काढण्याची कल्पना पुढे आली.