रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निधीबाबत शंका घेणे गैर – सीतारामन

2018 11img15 Nov 2018 PTI11 15 2018 000062B e1551778432894 696x392

पुणे, वृत्तसंस्था | काँग्रेस नेते राहुल गांधी हे दुसऱ्याला चोर म्हणण्यात पटाईत आहेत. पण इतरांना चोर म्हणणाऱ्यांना जनतेनेच धडा शिकवलाय, असा टोला लगावतानाच रिझर्व्ह बँकेने सरकारला दिलेल्या निधीबाबत शंका उपस्थित करणे चुकीचे आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.

 

पुण्यात प्राप्तिकर आणि जीएसटी अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सीतारामन यांनी राहुल गांधींवर टीका केली. सरकारला किती निधी द्यायचा याचा निर्णय आरबीआयने समिती नेमून घेतला. समितीच्या सात बैठकांनंतर हा निर्णय घेण्यात आला. आरबीआयचे माजी गव्हर्नर बिमल जालान या समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणे गैर आहे, असेही त्या म्हणाल्या.

आरबीआयच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित करणे किंवा त्याला चोरी म्हणणे योग्य नाही. काँग्रेसकडून आरबीआयच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणे, ही दुर्देवी गोष्ट असल्याचे सांगतानाच काँग्रेसने आरबीआयची प्रतिमा मलिन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पैशाच्या विनियोगावर मौन :- दरम्यान, आरबीआयने दिलेल्या निधीचा कशासाठी वापर करणार? असा सवाल सीतारामन यांना आज नवी दिल्लीत विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी या प्रश्नाला सोयीस्करपणे बगल देत काहीही स्पष्ट केले नाही. आरबीआयच्या पैशांचा वापर कशासाठी केला जाणार हे आताच सांगता येणार नाही. त्याबाबतचा अजून निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही त्या म्हणाल्या. जीएसटीमध्ये कपात करणे माझ्या हातात नाही. त्याचा निर्णय जीएसटी परिषदेलाच करायचा आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Protected Content