युवा नेते मंगेश चव्हाण आयोजित तिरंगा सन्मान यात्रेस प्रचंड प्रतिसाद
चाळीसगाव प्रतिनिधी । 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून युवा नेते मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव शहरात ‘तिरंगा सन्मान यात्रा’ काढण्यात आली. या सन्मान यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. रेल्वेस्थानकापासून सुरू झालेली ही तिरंगा सन्मान यात्रा नेताजी चौक, शहीद स्मारक येथे उत्साहात समारोप झाला. चाळीसगावत ‘न भूतो न भविष्यती’ अशा प्रकारची तिरंग्याला सन्मान करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती. यावेळी चाळीसगावकर या रॅलीसाठी एकवटले होते.
रॅलीत विविध प्रतिकात्मक देखाव्याचे सादरीकरण
या रॅलीमध्ये विविध वेशभूषा व देखावे सादर करण्यात आले. त्यात सुरुवातीला भारताचे संविधान, तसेच ज्या महाराष्ट्रातील महामानवांना भारतरत्न मिळाले त्यांचा परिचय व महाराष्ट्रभूषण मिळालेले सन्माननीय व्यक्ती यांचा चित्रमय परिचय देणारा चित्ररथ होता. या चित्ररथा नंतर जळगावच्या रुद्र तांडव या संस्थेचे ढोल पथक होते. त्यांच्या ढोलांच्या आवाजाने संपुर्ण चाळीसगाव शहर हादरले होते. त्यामागे बग्गी मध्ये भार 5 मातेचे प्रतिरूप सादर करण्यात आले.
यासोबत बग्गीच्या बाजूला घोड्यांवर दोन मुली हातात तिरंगा घेऊन बसलेल्या होत्या. यापाठोपाठ ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून अनोखे देखावे करण्यात आले होते. त्यात महापुरुषांचा देखावा, क्रांतिकारी महिलांचा देखावा, भारतातील वेगवेगळ्या धार्मिक प्रतीकांचा देखावा, भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या फाशीचा देखावा करण्यात आलेला होता. तसेच ट्रॅक्टरवर मल्लखांबच्या माध्यमातून चित्तथरारक असे प्रकार दाखवण्यात आले. मर्दानी खेळांच्या माध्यमातून शिवकालीन मर्दानी खेळ जसे तलवारबाजी, निशानेबाजी असे वेगवेगळे मर्दानी खेळ सादर करण्यात आले. साने गुरुजी व आंबेडकर विद्यालयाचे लेझीम पथकाचाही सहभाग होता. स्त्रियांदर्भात, ‘बेटी बचाव बेटी पढाव’ संदर्भात घोषवाक्य पथक या ठिकाणी होते. आणि आदिवासी भागातील लोकनृत्य सादर करणारे एक स्वतंत्र पथक या ठिकाणी सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेत होते. गुजरात बॉर्डर वर सादर होणाऱ्या आदिवासींची प्राण्यांची वेशभूषा घालून ते नृत्य केले जायचे त्याचाही सहभाग होता.
अनेक सामाजिक व शाळांचा सहभाग
आयोजित केलेल्या यात्रोत तहजीब उर्दू विद्यालय, साने गुरुजी विद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, राष्ट्रीय प्राथमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. अत्यंत देखण्या स्वरूपातला हा सोहळा चाळीसगाव वासीयांनी अनुभवला. युवा नेते मंगेश दादा चव्हाण यांनी तिरंगा सन्मान यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानून, भविष्यात तिरंगाचे सन्मानार्थ सर्व चाळीसगावकर राष्ट्राला अभिवादन करण्यासाठी अशाच प्रकारे एकवटतील अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरातील अनेक सामाजिक संघटना राजकीय संघटनांचे पदाधिकारी यांनी सहभाग नोंदविला.
यांची होती उपस्थिती
यावेळी ज्येष्ठ नेते वसंतराव चंद्रात्रे, प्रितमदास रावलणी, नगरसेवक सोमसिंग राजपूत, नगरसेवक चंद्रकांत तायडे, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, सतीश पाटे, नगरसेवक बापू अहिरे, सुनील निकम, रोहिणीच्या अनिल नागरे, नगरसेविका विजया पवार, नगरसेविका संगीता गवळी, नगरसेविका वैशाली पवार, भिकन पवार, लक्ष्मण शिरसाठ यासह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.