वाळू माफियांकडून पोलिसांवर दगडफेक;तीन कर्मचारी जखमी

 

जळगाव (प्रतिनिधी) अवैध वाळु तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या आरसीपी पथकातील तीन कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना खेडी नदीपात्रात शुक्रवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी अज्ञात २० ते २२ लोकांविरुद्ध तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, आरसीपीच्या पथकातील पोलिस नाईक प्रकाश मन्साराम वाघ यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी रात्री २२ पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक वाळु तस्करांवर कारवाईसाठी मुख्यालयातून निघाले होते. रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांना खेडी गावाजवळ वाळु वाहुन नेणारे एक ट्रॅक्टर मिळुन आले. ट्रॅक्टर जप्तीची कारवाई पुर्ण करुन हे ट्रॅक्टर तालुका पोलिस ठाण्यात आणत होते. त्याचवेळी घटनास्थळापासून थोड्याच अंतरावर अंधार लपून बसलेल्या सुमारे २० ते २२ वाळु तस्करांनी पोलिसांवर हल्ला चढवला. त्यांनी अंधारातून पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी योगेश पाटील, तौसीफ पठाण आणि ज्ञानेश्वर चौधरी हे जखमी झालेत. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्थानकात पोलीस नाईक प्रकाश वाघ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात १० ते १२ लोकांविरुद्ध दरोड्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण, वासुदेव मराठे तपास करीत आहेत.दरम्यान, पोलीस प्रशासनाने या हल्ल्याची गंभीर दखल घेतली असून आरोपींचा शोध सुरु केला आहे.

Add Comment

Protected Content