नवी मुंबई पोलिस दलातील तीन पोलिस अधिकारी राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नवी मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने तीन दिवसांपूर्वी राज्यपाल भवनात सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये नवी मुंबई पोलीस दलाचे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र मिसाळ तसेच पोलीस उपनिरिक्षक निघोट यांना पदक व सन्मानपत्राने गौरविण्यात आले आहे.

राज्याच्या गृहविभागाने २०२२ साली प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) राष्ट्रपती महोदयांनी गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल पोलीस पदकाची घोषणा केली होती. या घोषणेनंतर पदक अलंकरण सोहळा ६ जून रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पोलीस अधिका-यांना राज्यपाल भवनात पदक प्रदान करण्यात आले. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदक विजेत्या पोलीस अधिका-यांचे अभिनंदन केले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त लांडगे यांनी यापूर्वी वरिष्ठ पोलीस निरिक्षक सेवेत सोनसाखळी चोरीतील सराईत चोरट्याला पोलीस पथकासह गोळीबार करुन पकडले होते. तसेच आंतरराज्य तांदुळ घोटाळा लांडगे यांनी उघडकीस आणला होता. कळंबोली येथील बॉम्ब प्रकरणासह, पोलीसाची हत्या करुन त्याचा अपघाताचा बनाव केल्याप्रकरणाची त्यांनी उकल केली होती. अशा अनेक उल्लेखनीय तपासामुळे त्यांचा सन्मान करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पोलीस दलाकडून देण्यात आली.

Protected Content