नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिकरोड परिसरात मंगळवारी मध्यरात्री माजी नगरसेविकेच्या पतीसह अन्य तिघांवर धारधार शस्त्राने वार केल्याची घटना उघडकीस आली. वाढदिवशी रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांना हटकल्याने जीवघेणा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरात वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना काही तरुण रस्त्यावर गोंधळ घालत होते. त्यावेळी माजी नगरसेविकाच्या पतीने त्यांना हटकले. यावर संतापलेल्या तरुणांनी माजी नगरसेविकेच्या पतीसह अन्य तिघांवर धारधार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. या हल्लानंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून नाशिकमध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
नाशिकमध्ये खुलेआम वाहनांची तोडफोड, जाळपोळ, लूटमार आणि हत्या यांसारख्या घटना सुरूच आहेत. नाशिक शहरात गेल्या महिन्याभरापासून टोळक्यांकडून तलवारी नाचवत गोळीबार केल्याचे अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, आता माजी नगरसेविकाच्या पतीवर हल्ला केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणातील गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक लोक करीत आहेत.