दुचाकीच्या धडकेत शाळकरी विद्यार्थी जखमी

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील मरीमाता मंदिराजवळ पायी जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्याला मागून दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवार ९ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हाजी शेख इब्राहिम अब्दुल रसूल (वय-३९) रा. पातालनगरी, धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचा मुलगा मोहम्मद अमीर शेख इब्राहिम (वय-१३) हा विद्यार्थी २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी शाळेतून घरी पायी जात असताना मरी माता मंदिरा जवळ मागून अज्ञात दुचाकीधारकाने जोरदार धडक दिली. या धडकेत मोहम्मद अमीर शेख इब्राहिम हा विद्यार्थी जखमी झाला, तसेच अज्ञात दुचाकीधारक हा दुचाकी घेऊन पसार झाला. दरम्यान अपघातग्रस्त झालेल्या विद्यार्थ्याला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघात प्रकरणी अखेर बुधवार ९ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता हाजी शेख इब्राहिम अब्दुल रसूल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रामदास पावरा करीत आहे.

Protected Content