
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । होळीच्या सणानिमित्त देवदर्शन करून आपल्या मूळ गावी परतणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड येथील एका कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. मालेगाव परिसरात शुक्रवारी ६ मार्च रोजी सकाळी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात ४ वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सातोड गावावर शोककळा पसरली आहे.

होळीच्या सणासाठी गावी येताना झाला अपघात :
सातोड येथील नाफडे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी नाशिक येथे वास्तव्यास आहे. होळीच्या सणानिमित्त कुलदैवताचे दर्शन घेऊन ते नाशिकहून आपल्या मूळ गावी सातोडकडे खाजगी वाहनाने येत होते. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मालेगाव परिसरात त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, गाडीतील तिघांचा जागीच प्राण गेला.
मृतक आणि जखमींची नावे :
या अपघातात दीपक किशोर नाफडे (वय ३५), प्रथमेश दीपक नाफडे (वय ०४) आणि अंकिता संजय नाफडे (वय १९) या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर संजय पांडुरंग नाफडे (वय ५०), चारुलता संजय नाफडे आणि पूजा दीपक नाफडे (वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
गावात पसरली हळहळ :
घटनेची माहिती मिळताच सातोड गावचे पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी तात्काळ मालेगावकडे धाव घेतली. आपल्या हक्काच्या माणसांना सण साजरा करण्यासाठी येताना अशा प्रकारे मृत्यूने गाठावे, या कल्पनेने संपूर्ण मुक्ताईनगर तालुका हळहळत आहे. मृतांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी सातोड गावी आणण्यात येत असून परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.



