विद्यूत खंब्यावरील आकोडे काढल्याच्या कारणावरून महावितरण कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वीज तारांवर टाकलेले आकोडे काढल्याच्या रागातून भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथे वीज कंपनीच्या महिला कर्मचार्‍यासह तिघांना मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी १८ जून रोजी सकाळी ११.३० वाजता घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मारहाणीच्या घटनेचे वीज कंपनीतील कर्मचार्‍यांनी निषेध करीत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील निंभोरा गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीचे चार-ते पाच कर्मचारी मंगळवारी १८ जून रोजी सकाळी ११.३० वाजता गावात गेल्यानंतर वीज तारांवर आकोडे टाकण्यात आल्याचे दिसून आले. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी हे आकोडे काढले. याच्या रागातून संशयीत गणेश उर्फ गोल्या माधव सोनवणे व देवा (पूर्ण नाव माहित नाही) यांनी वीज कंपनीचे वरीष्ठ तंत्रज्ञ समाधान भास्कर बुगले व सचिन काकडे यांना मारहाण केली तसेच गर्दीतील दोन अनोळखी महिलांनी वीज तारांवरील काढलेल्या सर्विस वायरने महिला कर्मचारी आशा सुनील भटकर यांना मारहाण केली.

मारहाणीच्या प्रकारानंतर कर्मचार्‍यांनी ही घटना सहा. अभियंता विकास कोळंबे, उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांना कळवली. त्यानुसार वीज कंपनीचे वरीष्ठ तंत्रज्ञ समाधान भास्कर बुगले (वय-३४, खडका, ता.भुसावळ) यांनी दुपारी ४ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी गोल्या माधव सोनवणे, देवा व अन्य दोन अनोळखी महिलांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शामकुमार मोरे हे करीत आहे.

Protected Content