चोपडा, प्रतिनिधी | येथील विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सूर्यमाला व अंतराळातील अनोखी दृश्ये थेट स्वतः हाताळण्याची संधी नुकतीच उपलब्ध करून देण्यात आली होती. आधुनिक तंत्रज्ञानाने ही किमया घडवली असून त्यातून मिळणारा अमूल्य असा आनंद विद्यार्थ्यांनी यावेळी अनुभवला.
विद्यालयात विविध उपक्रम राबवणारे कलाशिक्षक राकेश राजकुमार विसपुते यांनी मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या मार्गदर्शनाखाली “एक्सफ्लोरर फॉर मर्ज क्यूब” या ॲप्लिकेशनचा वापर करून विद्यार्थ्यांना भूगोल, विज्ञान, कला इत्यादी विषयांचे ज्ञान दिले. यात खास करून प्रत्येक ग्रह आणि त्याच्या उपग्रहांची माहिती, विविध मानवी अवयव, विविध संग्रहालयातील मूर्तींची माहिती, थ्री डी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना उपलब्ध देण्यात येते. यावेळी त्यांना ती स्वतः हाताळण्याची संधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या त्याचा विशेष अभ्यास करता येतो.
याप्रसंगी कलाशिक्षक राकेश विसपुते म्हणाले की मोबाईल मध्ये “एक्सप्लोरर फॉर्म क्यू ” हे ॲप गूगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून घ्यावे.त्याची मार्कर इमेज असणारी मर्ज क्युब डाऊनलोड करून घ्यावी. मोबाईल मधील ॲप उघडून मर्ज क्युबवर स्कॅन केल्यास थ्रीडी स्वरूपात सूर्यमाला, मानवी अवयव, संग्रहालयातील मूर्त्या आपल्याला दिसतात. या दिसणाऱ्या भागाला स्पर्श केल्यास त्याची माहिती प्रक्षेपित होते व ती मुलांना अधिक चांगल्या पद्धतीने समजते व दीर्घकाळ लक्षात राहते. त्यामुळे मुलांचा शिकण्याचा आनंद वाढतो. हा उपक्रम राबवण्यासाठी विद्यालयातील उपशिक्षक पवन लाठी, जावेद तडवी, सरला शिंदे, नूतन चौधरी यांच्यासह सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, विश्वस्त सुधाकर केंगे, श्रीमती मंगला जोशी यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ, तसेच सह सर्व शिक्षकवृंद यांनी संबंधितांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.