सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नामनिर्देशनपत्रांच्या छाननीमध्ये ‘तीन अपत्य’ कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या दोन प्रमुख उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १६ (१)(क) अन्वये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

प्रभाग १० (ब) मधील अर्ज अवैध:

प्रभाग क्रमांक १० (ब) (सर्वसाधारण) येथील राष्ट्रवादीचे (अजितदादा गट) उमेदवार शे. अल्लाबक्ष शे. नजीर (गुड्डू भाऊ) यांचा अर्ज अवैध घोषित करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) च्या उमेदवारांनी हरकत घेतली होती. तक्रारीनुसार, उमेदवाराला १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य (जन्म १२ एप्रिल २०२०) असल्याचे सिद्ध झाले. उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात केवळ दोनच अपत्यांचा उल्लेख करून बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र सावदा व रावेर नगरपरिषदेकडील जन्मनोंदवह्या तपासल्यानंतर त्यांचा बचाव नामंजूर करण्यात आला.
प्रभाग २ (ब) मध्येही कारवाई:
याचप्रमाणे, प्रभाग क्रमांक २ (ब) (सर्वसाधारण महिला) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजितदादा गट) उमेदवार आसमाबी शेख अल्लाबक्ष यांचेही नामनिर्देशनपत्र याच ‘तीन अपत्य’ निकषामुळे अवैध ठरले आहे. त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीत तिन्ही अपत्यांचे जन्म दाखले सादर करण्यात आले होते. सदगुरू हॉस्पिटल, सावदा येथील जन्मनोंदीवरून तिसऱ्या अपत्याचा जन्म १२ एप्रिल २०२० रोजी झाल्याचे सिद्ध झाले. अर्ज अवैध ठरलेल्या प्रभाग १० (ब) मधील उमेदवाराच्या त्या पत्नी असल्याने दोघांनाही कायद्यानुसार अपात्र ठरविण्यात आले.
कायदेशीर तरतूद व अपील:
कलम १६ (१)(क) नुसार, १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीस नगरपरिषद निवडणूक लढविण्यास अपात्रता लागू होते. या दोन्ही प्रकरणांत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही अट लागू केली आहे. या निर्णयाविरुद्ध वैधरीत्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यापासून तीन दिवसांच्या आत मा. जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे अपील करता येणार आहे. या निर्णयामुळे सावदा नगरपरिषद निवडणुकीत मोठी खळबळ उडाली आहे.



