मुक्ताईनगरात चक्क तीन चंद्रकांत पाटील विरूध्द लढणार तीन रोहिणी खडसे !

मुक्ताईनगर-पंकज कपले एक्सक्लुझीव्ह रिपोर्ट | जिल्हाच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून यंदा एका नावाचे एक वा दोन नव्हे तर तीन-तीन उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे मोठी धमाल उडाली आहे.

राजकारण म्हटले की, साम-दाम-दंड-भेद हे सर्व काही आलेच ! यात विरूध्द उमेदवाराच्या नावाचे अन्य उमेदवार उभे करण्याची खेळी अनेक मतदारसंघांमध्ये होत असते. यात नावाच्या गफलतीमुळे बऱ्याचदा उलटफेर होण्याची शक्यता देखील असते. या अनुषंगाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आज छाननी पूर्ण झाल्यानंतर एक अतिशय भन्नाट असा योगायोग जुडून आला असून कदाचित तो राज्यात एकमेव असू शकतो.

या विधानसभा निवडणुकीत महायुतीतर्फे विद्यमान आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील हे तर महाविकास आघाडीतर्फे शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी एकनाथ खडसे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, याच्या जोडीला चंद्रकांत चुडामण पाटील ( रा. मानेगाव ता. मुक्ताईनगर ) आणि चंद्रकांत शिवाजी पाटील ( रा. चिंचखेडा, ता. मुक्ताईनगर ) या दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या जोडीला अजून दोन चंद्रकांत पाटील हे मैदानात उतरले आहेत.

दरम्यान, रोहिणी एकनाथ खडसे यांच्या सोबतीलाच रोहिणी गोकुळ खडसे ( रा. बाभुळगाव, जिल्हा अकोला ) व रोहिणी पंडित खडसे (रा. नागरतास, ता. मालेगाव, जिल्हा नाशिक ) या दोन्हींनी उमेदवारी दाखल केली आहे. हे कमी होते की काय ? तर रोहिणी संतोष कवळे (रा. इंदापूर, जिल्हा पुणे ) यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. म्हणजेच मुक्ताईनगर मतदारसंघातून तीन चंद्रकांत पाटील यांच्या विरूध्द तीन रोहिणी खडसे या मैदानात उतरल्या आहेत. यांच्या जोडीला अजून एक रोहिणीताई देखील आहेच !

आज उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात आली असली तरी माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. यात साधारणपणे कोणताही उमेदवार माघार घेण्याची शक्यता धुसर आहे. याचमुळे मुक्ताईनगरात तीन चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तीन रोहिणी खडसे असा मुकाबला रंगणार असून याच्या जोडीला अन्य पक्षांचे व अपक्ष अशा चोवीस उमेदवारांची मांदियाळी आहेच. यातून माघार कोण घेणार व मैदानात कोण बाजी मारणार याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. तोवर, तीन चंद्रकांत पाटील विरूध्द तीन रोहिणी खडसे हा मुकाबला सर्वत्र गाजणार हे मात्र नक्की !

Protected Content