जळगाव प्रतिनिधी । शहरातील कांचन नगर येथे राहणाऱ्या तरूणावर चार हल्लेखोरांनी गोळीबार करून तरूणाला जखमी केल्याची घटना घडली होती. या घटनेत हल्लेखोर एक तरूण देखील गंभीररित्या जखमी झाला आहे. या गुन्ह्यातील इतर तीन संशयित आरोपींना शनीपेठ पोलीसांनी अटक केली आहे अशी माहिती पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, कांचन नगर परिसरात आकाश मुरलीधर सपकाळे हा आपल्या घरात आपल्या कुटुंबियांसह राहतो. आज गुरूवार २३ सप्टेंबर सकाळी ८ वाजता अकाश घरात असतांना चार हल्लेखोर दुचाकीने आकाशच्या घरासमोर आले. आकाश घरात झोपलेला असतांना चार जणांपैकी दोन जण आकाश सपकाळेच्या घरात घुसून आकाशवर गोळीबार केली. यात आकाशच्या उजव्या हाताच्या करंगळीला जखम झाली. विकी उर्फ मयूर दिपक अलोने, बापू अशोक सपकाळे व 2 अज्ञात व्यक्ती या चार जणांनी हा हल्ला केल्याची माहिती जखमी आकाश सपकाळे यांनी सांगिेतले. विकी अलोने याने गोळीबार केल्यानंतर फायरिंगचा आवाज आल्यानंतर जखमी आकाशचा भाऊ नितीन याने संशयित आरोपी विकी अलोने पकडले असता दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत घरात चार फायरिंग झाले. या झटापटीत संशयित विकी हा दरवाजाच्या पायरीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखपत झाल्याने तो बेशुध्द पडला. त्यांच्या हातातील गावठी पिस्तूल, मोबाईल, रूमाला आणि राऊंड खाली पडले.
आज झालेला गोळीबार हा पुर्ववैमनश्येतून झालाची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यातील जखमी झालेला तरूण आकाश सपकाळे आणि जखमी झालेला संशयित आरोपी विकी अलोने या दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या गुन्ह्याप्रकरणी विकी उर्फ मयूर दिपक अलोने, सोनू अशोक सपकाळे, बापू आकाश सपकाळे यांना शनीपेठ पोलीसांनी अटक केली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली आहे.