मुंबई प्रतिनिधी । आपल्या मुलाला शाळेत प्रवेश मिळाला नाही म्हणून पुण्याच्या एका व्यक्तीने थेट मंत्रालय उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल पाठविल्याचे निष्पन्न झाले असून संबंधीत पालकाला अटक करण्यात आली आहे.
मुलाला शाळेत अॅडमिशन मिळाले नाही म्हणून शैलेश शिंदे या पालकाने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल संध्याकाळी ईमेल मिळाल्यानंतर तातडीची पावलं उचलत पुण्यातील घोरपडी भागात राहणार्या शैलेश शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
या प्रकरणी आरोपी शैलेश शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस पुढील कारवाई करत आहेत. मुलांचे शैक्षणिक वर्ष हॅचिंग शाळेने वाया घालवले, आम्हाला न्याय मिळत नाही, असा दावा आरोपी शैलेश शिंदेंसोबतचे दुसरे अन्य पालक संतोष पोलकमवार यांनी केला आहे.
शिक्षण विभागाकडे तक्रार केली म्हणून शाळा आम्हाला मुद्दाम त्रास देत आहे. आधी १५ मुलांचा प्रश्न होता मात्र आता ३ मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना १५० मेल केले, मात्र उत्तर दिलं नाही. मुलांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे. पाचवीपासून हॅचिंग शाळा त्रास देत आहे. मुलांना जूनमध्ये पास करण्याऐवजी सप्टेंबरमध्ये प्रमोट करते. २०१६ पासून हे सुरु आहे असा आरोपही संतोष पोलकमवार यांनी केला आहे.