मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या धमकीनंतर आता भाजप आमदारालाही अशी धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे. महाले यांना धमकीचं पत्र प्राप्त झालं असून त्या आज दुपारी चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत. या घटनेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
राजकीय कारकीर्द आणि लोकप्रियता
श्वेता महाले यांची आमदारकीची ही दुसरी टर्म असून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात जिल्हा परिषदेतून केली होती. अभ्यासू आणि आक्रमक स्वभावामुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. महिला, शेतकरी आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांची ठाम भूमिका आहे आणि त्या नेहमीच यावर आवाज उठवत असतात. जिल्हा परिषदेच्या उंद्री सर्कलचे प्रतिनिधीत्व करताना त्यांनी महिला व बालकल्याण सभापती म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. सभापती असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामे केली.
चिखली मतदारसंघात १५ वर्षांपासून भाजपला विजय मिळवता आला नव्हता. २०१९ मध्ये भाजपने श्वेता महाले यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी काँग्रेसचे दोन वेळा आमदार राहिलेले राहुल बोंद्रे यांचा ६,८५१ मतांनी पराभव केला. त्यांना ९२,२०५ मते मिळाली तर बोंद्रे यांना ८५,४३३ मते मिळाली. २००४ नंतर भाजपला या मतदारसंघात प्रथमच विजय मिळवता आला. त्यांच्या या यशाने पक्षाच्या गडबडलेल्या समीकरणांमध्ये स्थैर्य आणले.
महाले यांना दोन्ही कुटुंबांकडून राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांचे पती विद्याधर महाले हे प्रशासकीय खात्यात उच्चपदावर असून दिवंगत भाजप नेते भाऊसाहेब फुंडकर यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. २०१४ मध्ये त्यांनी विधानसभेसाठी प्रयत्न केला होता, मात्र तिकीट मिळू शकले नाही. मात्र, २०१९ मध्ये संधी मिळताच त्यांनी विजय मिळवत आपल्या राजकीय कौशल्याचा ठसा उमटवला. आता मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.