Home Cities जळगाव ऋषीपंचमी निमित्त गिरणा तीरावर हजारों महिलांची श्रद्धेची मांदियाळी 

ऋषीपंचमी निमित्त गिरणा तीरावर हजारों महिलांची श्रद्धेची मांदियाळी 


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या ऋषीपंचमी पर्वानिमित्त जळगाव तालुक्यातील कानळदा येथील महर्षी कन्वआश्रम परिसरात हजारो महिला भाविकांनी गिरणा नदीत पवित्र स्नान करत श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवला. पहाटेपासून सुरू झालेल्या स्नानासाठी गिरणा घाटावर महिलांचा जनसागर उसळला होता.

परंपरेनुसार महिलांनी गिरणा नदीत स्नान करून महादेव मंदिरात शंकरपूजन केले तसेच ऋषींच्या स्मृतीला वंदन करत त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याची भावना व्यक्त केली. मंदिराजवळील विशेष पूजेमध्ये महिलांनी सहभाग नोंदवला, तसेच पारंपरिक पोशाखात, ओव्या व मंत्रोच्चारात अखंड भक्तिभाव दिसून आला. “ॐ नमः शिवाय” च्या घोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसत होता.

यावर्षी साधारणतः ३५ ते ४० हजार महिला श्रद्धाळू जिल्ह्यातून तसेच परिसरातील अन्य भागांमधून येथे दाखल झाल्या होत्या. गर्दीची तीव्रता असूनही सुरळीत व्यवस्थापन झाल्याने भाविकांना कोणतीही अडचण जाणवली नाही. पोलीस दल, आरोग्य विभाग, होमगार्ड व स्वयंसेवी संस्था यांनी वाहतूक, सुरक्षा, वैद्यकीय मदत आणि गर्दी नियोजनाच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

महर्षी कन्वआश्रमाचे गादीपती स्वामी अद्वितानंद सरस्वती यांनी लाईव्ह ट्रेंड्स शी बोलताना सांगितले की, “ऋषीपंचमी स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी केलेले स्नान व पूजन केवळ आध्यात्मिकच नव्हे तर मानसिक शुद्धीचे प्रतीक मानले जाते. या माध्यमातून समाजात नैतिकता, संयम आणि धर्माचरण रुजते.”

या अध्यात्मिक व सांस्कृतिक पर्वात महिलांचा जोश, संयम आणि श्रद्धा यांची उत्तम सांगड पाहायला मिळाली. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला, तर गावकऱ्यांनीही स्वच्छता व मदतीच्या कामात महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.


Protected Content

Play sound