मुंबई प्रतिनिधी । येथील ‘मेट्रो ३’चे कारशेड आरे कॉलनीत बनविण्यासाठी तेथील हजारो झाडे तोडण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका काल मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. तसेच, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने तिथे दाद मागा, असे न्यायालयान याचिकाकर्त्यांना सांगितले. न्यायालयाचा हा निकाल येताच मेट्रो प्रशासनानं शुक्रवारी रात्रीपासूनच ‘आरे’तील झाडे तोडण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरणप्रेमी नागरिक, स्वयंसेवी संस्था, संघटनांचा यास तीव्र विरोध होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ‘मेट्रो ३’साठी रात्रीच्या अंधारात आरे कॉलनीतील झाडांवर कुऱ्हाड चालवणे हा लज्जास्पद आणि किळसवाणारा प्रकार असून झाडे तोडण्यासाठी इतकी तत्परता दाखवणाऱ्या या अधिकाऱ्यांना ‘पाकव्याप्त काश्मीर’मध्ये पाठवा आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची ड्युटी द्या,’ असा जोरदार हल्ला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी चढवला आहे. ‘आरे’तील कारशेडला विरोध दर्शवणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी लागोपाठ ट्वीट करत प्रशासनाच्या या तत्परतेवर टीकेचा घाव घातला आहे. ‘आरेमध्ये जे सुरू आहे ते भयंकर आहे. अनेक पर्यावरणप्रेमी व स्थानिक शिवसैनिक वृक्षतोडीला विरोध करण्याचा प्रयत्न करताहेत. पण तिथं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ज्या पद्धतीनं आरेतील जंगल नष्ट केलं जात आहे, ते भयंकर आहे. मुंबई मेट्रो ३ साठी सगळं काही उद्ध्वस्त केलं जातंय. पर्यावरण संवर्धनासाठी भारतानं संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडलेल्या भूमिकेच्या हे पूर्णपणे विरुद्ध आहे,’ असं आदित्य यांनी म्हटले आहे.