अयोध्येत कार्तिक पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांची गर्दी

ram

अयोध्या वृत्तसंस्था । आज संपूर्ण देशभरात कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीचा सण साजरा होत आहे. कार्तिक पौर्णिमेनिमित्त अयोध्या येथे शरयू नदीत स्नान करण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. अयोध्येतील राम की पायडी आणि नया घाट येथे स्नान करण्यासाठी ५ लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिलेल्या निकालात वादग्रस्त जागेवर राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा केला होता. त्याचबरोबर केंद्र सरकारने सुन्नी वक्फ मंडळाला मशीद उभारणीसाठी ५ एकराचा भूखंड मध्यवर्ती ठिकाणी द्यावा असेही निकालात म्हटले होते. अयोध्येचे जिल्हा दंडाधिकारी अनुज कुमार झा यांनी सांगितले, की इतर वेळी रामजन्मभूमी दर्शनासाठी आठ हजार भाविक तेथे भेट देतात. सणासुदीच्या काळात पन्नास हजार लोक दर्शनासाठी येतात. रामजन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राम जन्मभूमी परिसरात परिस्थिती सुरळीत असून सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सुरक्षित व अडचणींशिवाय दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे, पोलीस अधिकारी व दंडाधिकारी यांना तेथे तैनात करण्यात आले आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य, स्वच्छतागृहे, पेयजल या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. १८ ठिकाणी पाण्याचे टँकर पाठवले असून २० वैद्यकीय शिबिरे रुग्णवाहिका माध्यमातून सुरू केली आहेत. तीस फिरती स्वच्छतागृहे ठेवण्यात आली आहेत. अयोध्येचे माहिती उपसंचालक मुरलीधर सिंह यांनी सांगितले, की सोमवारी सायंकाळी चार वाजल्यापासूनच शरयू नदीत पवित्र स्नान करण्यास भाविकांनी सुरूवात केली असून मंगळवारी सायंकाळपर्यंत मुहूर्त आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार सोमवारी सायंकाळपासून कार्तिक पौर्णिमा सुरू झाली आहे.

Protected Content