महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करून ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्यांना अटक

बोदवड/जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडल्याचा रागातून वाळूमाफियांकडून महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करून वाळूने भरलेले ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील तीन संशयितांना बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून अटक करण्यात बोदवड पोलीसांना यश आले आहे.

जळगाव जिल्ह्यात वाळू वाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाने कंबर कसली आहे. जिल्हाभरात विविध पथके नेमून अवैध वाळू वाहतूकीसह मुरूम, गौण खनिजाची विना परवानगी वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. याच अनुषंगाने बोदवड तालुक्यातील महसूल पथकाने वाळूने भरलेले ट्रॅक्टरवर कारवाई करत असतांना वाळूमाफियांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करून वाळूचे ट्रॅक्टर पळून नेले होते. तर बोदवड तहसील कार्यालयात जमा केलेले वाळूचे ट्रॅक्टर देखील तहसील आवारातून चोरून नेले होते. या दोन्ही प्रकरणांबाबत बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुन्ह्यातील संशयित आरोपी जंगलू मांगो मोरे (वय-४०) रा. भिलाटी, बोदवड, अनिल एकनाथ शेळके (वय-४५) रा. जामठी दरवाजा, बोदवड आणि सुधाकर ओंकार राठोड (वय-२१) रा. पळासखेडा ता. बोदवड या तिघांना बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून अटक केली. संशयितांकडून चोरून नेलेले ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव हे करीत आहे.

Protected Content