डीबीटी अनुदान वाढीच्या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील शासकीय आदिवासी मुलांच्या आणि मुलींच्या वस्तीगृहातील सुमारे २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) अनुदान वाढवण्याची जोरदार मागणी केली. विद्यार्थ्यांनी यावल बसस्थानकात एकत्र येत प्रकल्प कार्यालयावर पायी मोर्चा काढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

८ वर्षांपासून डीबीटी अनुदानात वाढ नाही
सन २०१८ पासून आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण व भोजनासाठी डीबीटी अनुदान दिले जात आहे. मात्र गेल्या आठ वर्षांत या अनुदानात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या अनुदानात वाढ न केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन कठीण होणार आहे, असा दावा विद्यार्थ्यांनी केला. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

विद्यार्थ्यांचा ठाम निर्धार लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही
या आधी अनेक वेळा निवेदन देऊनही मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे यावेळी थेट आदिवासी विकास मंत्र्यांकडून ठोस लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती. विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी नाशिक विभागीय आयुक्तांशी थेट विद्यार्थ्यांचे बोलणे करून दिले. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले.

आदिवासी विकास मंत्र्यांचे आश्वासन आणि आंदोलनाची समाप्ती
सायंकाळी सहा वाजता राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याशी विद्यार्थ्यांनी थेट मोबाईलवरून संपर्क साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या विधीमंडळात मांडण्याचे आणि त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

प्रकल्प कार्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी सुविधा
ठिय्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प कार्यालयाकडून जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावल पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

<p>Protected Content</p>