पाचोरा (प्रतिनिधी) आज येथे प्रांताधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णायक अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये मतदारांना कोण-कोणत्या सुविधा देण्यात येतील आणि कायदा-सुव्यवस्था कशाप्रकारे ठेवण्यात येईल, याबद्दल माहिती देण्यात आली. येथील निवडणूक विभागाच्या वतीने लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली असून येथील विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ३३० मतदान केंद्र आहेत. पाचोरा विधानसभा मतदार संघात येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान निर्भय वातावरणात आणि शांततेत पार पाडण्याकरीता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारवाई निवडणूक प्रकिया पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार आहे.
इ.व्ही.एम. आणि व्ही.व्ही.पॅटबाबत जनजागृती करिता दोन टप्पे करण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक दिनांक २८ डिसेंबर २०१३ पासून सुरु करण्यात आलेला होता तो पूर्ण झालेला असून दुसरा टप्पा दिनांक १२ मार्च २०१९ पासून सुरू करण्यात आलेला आहे. एकूण ३२ सेक्टर करिता ३२ ऑफिसर व तीन राखीव असे ३५ सेक्टर ऑफिसर यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना आज अखेर एकूण तीन वेळा प्रशिक्षणे देण्यात आलेले आहे.
आदर्श आचार संहिता दिनांक १० मार्च २०१९ पासून लागू करण्यात आलेली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सर्व संबंधित विभागांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे तसेच सदर आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आलेली असून या कामी केलेल्या कारवाईमध्ये फ्लेक्स, बॅनर, झेंडे, फलक, हायमॅक्स, कोनशिला अनावरण, पोल कव्हर इत्यादीबाबत ४८२३ ठिकाणी कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे. कायदा व सुव्यस्थेबाबतही योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
सर्व मतदान केंद्रांवर संपर्क यंत्रणेची सुविधा पुरवण्यात आलेली आहे. तसेच मतदान केंद्राच्या गावातील महत्वाचे संपर्क क्रमांक जसे की, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील,स्वस्त धान्य दुकानदार, बीट हवालदार इत्यादींचा कम्युनिकेशन प्लॅनमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ज्या नव मतदारांचे नाव मतदान यादीत नसेल त्यांना सध्या मतदार नाव नोंदणी सुरू असल्याने नोंदणीचे आवाहन यावेळी करण्यात आले. निवडणुकीच्या १० दिवस आधीपर्यंत मतदान नोंदणी सुरू असेल, त्याशिवाय यावेळी दिव्यांग मतदारांसाठी मतदानाचा हक्क बजविण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून थेट शासनाचे अधिकारी त्यांना घरी जावून घेऊन येण्याची व मतदान झाल्यावर परत घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पहा । मतदानासह इतर गोष्टींची माहिती देतांना प्रांताधिकारी राजेंद्र कचरे