मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोविडच्या विरोधात अनेक लसी उपलब्ध झाल्या असतांना आता फक्त एका डोसमध्ये कोरोनाच्या संसर्गावर अभेद्य कवच प्रदान करणारी लस भारतीय नागरिकांना मिळणार आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, सिंगल डोसच्या स्पुटनिक लाइट लसीचा आपत्कालीन वापर करण्यास ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे स्पुटनिक लाइट या रशियन लसीचा देशभरात वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला असून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
या ट्विटमध्ये आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालली आहे. मात्र नव्या व्हेरिएंटच्या शिरकावाची भीती कायम आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. या मोहिमेला गती देण्यासाठी डीसीजीआयने सिंगल डोसवाल्या स्पुटनिक लाइट लसीला आपत्कालीन मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशात आता एकूण ९ कोरोना प्रतिबंधक लसींचा वापर करता येणार आहे. या लसीच्या वापरामुळे कोरोना महामारीविरोधातील सामूहिक लढयाला आणखी बळकटी मिळेल, असे ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांनी केले.
स्पुटनिक लाइट ही रशियाने विकसित केली असून या लसीचा केवळ एक डोस घ्यावा लागेल. डीसीजीआयच्या तज्ञांच्या समितीने दोन दिवसांपूर्वीच या लसीच्या वापराबाबत शिफारस केली होती. ती शिफारस तातडीने मंजूर करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत ज्या आठ कोरोना प्रतिबंधक लसींचा वापर होत आहे त्या सर्व लसी डबल डोसच्या आहेत. झायदस कॅडिलाच्या लसीला अलीकडेच परवानगी मिळाली असून याचे तीन डोस आहेत. तर स्फुटनीक लाईट या लसीचा फक्त एक डोस कोविडवर परिणामकारक ठरणार आहे.