रावेर (प्रतिनिधी) चाळीस वर्षांच्या काळात अनेक मंत्रिपदं मिळाली, मात्र मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले, म्हणून कोणताही गुन्हा नसताना आपली ही अवस्था झाली आहे, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा आपली खदखद व्यक्त केली आहे. सावदा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित ‘एक शाम नाथाभाऊ के नाम’ या मुशायराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आपण मंत्रिपदावर असताना जाती-धर्माच्या आधारावर नव्हे तर मुस्लिम समाज मागास असल्याने सामाजिक भावनेतून नेहमीच मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला, असेही खडसे यावेळी म्हणाले. मंत्रिपदावर असताना मुस्लिम वख्फ बोर्डाच्या महागड्या जमिनी ताब्यात घेत असताना त्यातील एका जमिनीवरील इमारत पाडण्याची नोटीस दिली होती, ती जमीन अंबानींची निघाली. यावेळी केलेली कारवाई आमच्याकडे काही जणांना आवडली नाही. त्यावेळी मोठा दबावही आला होता, मात्र सामाजिक भावनेतून आपण चांगले काम करण्याचा प्रयत्न केला होता, असेही खडसे म्हणाले. मंत्रिपदाचे काय, येतात आणि जात असतात. ४० वर्षांच्या काळात आपण अनेक मंत्रिपद भूषवली असे खडसे सांगत असतानाच ‘पुढील काळात आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावे’ अशी इच्छा एका मुस्लिम कार्यकर्त्याने व्यक्त केली. यावर उत्तर देताना, मुख्यमंत्रीही होऊ, मात्र मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहिल्यामुळेच आपण कोणताही गुन्हा केलेला नसतानाही आपली अशी अवस्था झाली, असे सांगत खडसेंनी पुन्हा आपल्याच पक्षाविरोधातील खदखद बोलून दाखवली.