दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुतीला महाराष्ट्रात भरघोस मतदान मिळालं. या योजनेचा सरकारला चांगला फायदा अन् विधानसभेत एकहाती सत्ता स्थापन करण्यास यश आलं. आता हीच योजना दिल्लीत आम आदमी पक्ष राबवणार आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मार्च २०२४ मध्ये महिलांना प्रतिमहा १००० रुपये देण्याचे मान्य केले होते. परंतु, आता त्यांनी ही रक्कम वाढवली असून २१०० रुपये केले आहे. यासंदर्भात आजच त्यांनी माहिती दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी जाहीर केलं की दिल्ली मंत्रिमंडळाने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. जर आम आदमी पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर आला तर महिलांना २१०० रुपये दिले जातील, असं अरविंद केजरीवाल म्हणाले. या योजनेसाठी नावनोंदणीही उद्यापासून सुरू होणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.