शेतकरी आंदोलन नव्हे, सरकारचा चळवळ मोडण्याचा डाव – रविकांत तुपकर

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने सत्याग्रह करणे हा गुन्हा आहे का, असा सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उद्या, १९ मार्च रोजी मुंबईत शांततामय आंदोलन करत अरबी समुद्रात कर्जाचे सातबारे आणि सोयाबीन बुडवण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला आहे. मात्र, या आंदोलनाला खीळ घालण्यासाठी सरकार आणि बुलढाणा पोलिसांनी दडपशाहीचा अवलंब केल्याचा गंभीर आरोप तुपकर यांनी केला आहे.

रविकांत तुपकर यांनी सांगितले की, उद्याच्या आंदोलनासाठी बुलढाणा जिल्ह्यातून अंदाजे २५० वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघणार होता. परंतु, पोलिसांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या सहकाऱ्यांना झोपेतून उठवून फरफटत पोलीस ठाण्यात नेले आणि जबरदस्तीने अटक केली. “हा प्रकार केवळ आंदोलन चिरडण्याचा नाही, तर राज्यातील शेतकरी चळवळच मोडीत काढण्याचा सरकारचा कुटील डाव आहे,” असे तुपकर यांनी ठणकावून सांगितले. ते म्हणाले, “लोकशाही मार्गाने सत्याग्रह करणाऱ्या शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवण्यामागे कोण आहे आणि त्यांचा हेतू काय आहे, हे आम्हाला समजतंय. आम्ही दुधखुळे नाहीत.”

तुपकर यांनी सरकारवर निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याचा आरोप केला. “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, सोयाबीन-कापूस भावातील फरक देऊ, कांदा-धानाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ आणि दूध उत्पादकांना अनुदान देऊ, अशी आश्वासने सरकारने दिली होती. पण सत्तेवर आल्यावर ही सर्व आश्वासने विसरली. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आंदोलनाची गरजच नाही. पण शेतकऱ्यांना काहीच द्यायचं नाही आणि त्यांच्या हक्कांसाठी आंदोलनही करू द्यायचं नाही, हा कुठला न्याय आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुपकर यांच्या कुटुंबीयांनाही पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. “माझी आई, पत्नी, बहीण, काकू आणि सरकारी नोकरीत असणाऱ्या नातेवाईकांनाही टॉर्चर केलं जात आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणे हा गुन्हा आहे का? सरकार आणि पोलिसांना शेतकऱ्यांची एवढी भीती का वाटते?” असे प्रश्न त्यांनी विचारले. या दडपशाहीमुळे ते सध्या भूमिगत झाले असले, तरी आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“उद्या १९ मार्चला आम्ही अरबी समुद्रात कर्जाचे सातबारे बुडवून कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार आहोत. सोयाबीन आणि कापूस बुडवून सरकारचे लक्ष वेधणार आहोत,” असे तुपकर म्हणाले. ते पुढे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने आम्हाला सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. आम्ही चोर, दरोडेखोर किंवा दहशतवादी नाहीत. आम्ही बापाच्या घामाच्या दामासाठी लढतोय, आणि तो आमचा हक्क आहे.”

“जग पोशिंदा शेतकऱ्याला हलक्यात घेण्याची चूक राज्यकर्त्यांनी करू नये. शेतकऱ्यांची सहनशीलता संपली तर कर्जाचे सातबारे नव्हे, तर सरकारलाच अरबी समुद्रात बुडवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे,” असा थेट इशारा तुपकर यांनी दिला. त्यांनी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “इंग्रजांच्या काळातही एवढी दडपशाही नव्हती. बुलढाणा पोलिसांना नेमकं काय साध्य करायचं आहे? कोणाच्या सांगण्यावरून हे होतंय, हे आम्हाला समजतंय. पण आम्ही घाबरणार नाही,” असे ते ठामपणे म्हणाले.

शेतकरी चळवळीला दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकार आणि पोलिसांना आव्हान देत तुपकर म्हणाले, “आम्ही बापाच्या घामाच्या दामासाठी लढतोय. आम्ही डगमगणार नाही. उद्या आम्ही मुंबईत शांततामय सत्याग्रह करणारच.” शेतकऱ्यांच्या या लढ्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content