उदयनराजे भोसले यांच्या विजयी रॅलीत १० तोळे सोन्याच्या दागिन्यांवर चोरटयांचा डल्ला

सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उदयनराजे भोसले यांच्या विजयी मिरवणुकीमध्ये चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भव्यदिव्य विजयी मिरवणूक काढली. एकीकडे नेता जिंकून आल्याचा उत्साह स्थानिकांमध्ये पाहायला मिळाला. तर दुसरीकडे या मिरवणुकीमध्ये सहभागी होणे, काही जणांना महागात पडले. कारण मिरवणुकीत चोरट्यांनी तब्बल १० तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. दोन घटनांमध्ये तब्बल साडेपाच लाख रुपयांचा ऐवजही लुटल्याची चर्चा आहे. या संदर्भात पोलीस स्थानकात उदयनराजे भोसले समर्थकांच्या तक्रारी दाखल होत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये दोन तक्रारी दाखल झालेल्या आहेत. उदयनराजे भोसले यांच्या विजयानंतर समर्थकांनी जलमंदिर ते पोवई नाका आणि तेथून वखार महामंडळाच्या मतमोजणी केंद्रापर्यंत रॅली काढली होती. या रॅलीमध्ये पाच हजारांपेक्षा अधिक समर्थकांचा समावेश होता. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन जणांची आठ तोळे वजनाची सोन्याची साखळी लांबवल्याची माहिती समोर आली आहे.

कोडोली येथील रहिवासी अमर संजय जाधव हे देगाव फाटा चौक येथे रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोन्याची साखळी चोरट्यांनी लांबविली. हा प्रकार देगाव फाटा चौक परिसरात दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडला. रॅली संपल्यानंतर आपल्या गळ्यात सोन्याची साखळी नसल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. तर दुसर्‍या घटनेमध्ये शिवाजी सर्कल पोवई नाका येथे नरेश सीताराम अग्रवाल यांच्या गळ्यातील साडेचार तोळे वजनाची सोन्याची साखळीही चोरण्यात आली. या दोन्ही घटनांची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यासारख्याच आणखी दोन-चार घटना घडल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत अद्यापही तक्रार दाखल करण्यात आलेल्या नाहीत. या घटनांची दखल घेत सातारा पोलीस सक्रिय झाले आहे. उदयनराजे भोसले यांच्या रॅलीचे सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहेत.

Protected Content