Home क्राईम चोरट्यांचा सुळसुळाट : बंद घरातून पावणे पाच लाखांचा ऐवज लंपास

चोरट्यांचा सुळसुळाट : बंद घरातून पावणे पाच लाखांचा ऐवज लंपास


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून, अशोक नगर भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ४ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकडचा समावेश असून, या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिताबाई ईश्वर धनगर (वय ४९, रा. अशोक नगर, नागलवाडी रोड) या आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. १५ ते १६ मार्चच्या कालावधीमध्ये त्यांचे घर बंद असताना चोरट्यांनी ही संधी साधली. अज्ञात चोरट्यांनी घराचे मुख्य कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेले दागिने व रोकड लंपास केली.

चोरट्यांनी कपाटातून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व गणपती मुर्ती आणि ३ लाख ३२ हजारांची रोकड असा एकुण ४ लाख ८६ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी तातडीने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करत आहेत.


Protected Content

Play sound