Home क्राईम धरणगावात चोरट्यांचा धुमाकूळ; रोख रक्कम व सोन्याची अंगठी लंपास!

धरणगावात चोरट्यांचा धुमाकूळ; रोख रक्कम व सोन्याची अंगठी लंपास!


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील नगरपरिषद हद्दीतील कृष्ण गीता नगर येथे ११ ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी शंकर जनार्दन पाटील यांच्या घरात डल्ला मारला. पाटील कुटुंब एका दिवसासाठी बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी ही संधी साधली. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर पाटील हे आपल्या कुटुंबासह शहादा येथे गेले होते. आज, १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:३० वाजता ते आपल्या घरी कृष्णा गीता नगरात परतले. घरात प्रवेश करताच त्यांना घर फोडल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ कॉलनीतील शेजाऱ्यांना बोलावले. सर्व कॉलनीवासी एकत्र जमल्यानंतर घरात प्रवेश केला असता, घरातील कपाट, किचनमधील डबे आणि बेडरूममधील बेड व कपाट हे सर्व अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील कपाटात ठेवलेले तीस हजार रुपये रोख आणि सोन्याची अंगठी चोरट्यांनी लंपास केली होती. या घटनेनंतर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली.

या चोरीमुळे कृष्ण गीता नगरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही कृष्ण गीता नगरमध्ये चोरट्यांनी अनेकदा चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


Protected Content

Play sound