
एरंडोल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील मालखेडा शिवारात कापूस चोरीचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले असून, अज्ञात चोरट्यांनी चक्क गावातील पोलीस पाटलाच्या शेतातील गोदामातून सुमारे १० क्विंटल कापूस चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये शेतकऱ्याचे अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे मोठे नुकसान झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालखेडा येथील पोलीस पाटील किशोर पाटील (वय ४७) यांच्या मालकीचे गट नं. १९ मध्ये शेत आहे. त्यांनी आपल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गोडाउन तयार केले होते, जिथे काढलेला कापूस साठवून ठेवला होता.
२७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.०० वाजेपासून ते २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ०६.३० वाजेच्या दरम्यान, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी या गोदामातून सुमारे १० क्विंटल कापूस चोरून नेला. कापसाची अंदाजित किंमत ५० हजार रुपये आहे. चोरीची ही घटना लक्षात येताच पोलीस पाटील किशोर पाटील यांनी तात्काळ कासोदा पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच स.पो.निरी. निलेश राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पो.ना. अकील खलील मुजावर हे या गुन्ह्याचे तपासी अंमलदार आहेत.



