जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पोलनपेठ येथील तीन दुकाने आणि चित्रा चैकातील कापड दुकान फोडून चोरी प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अजिंठा चौकातून अटक केली आहे. त्यांच्याकउून १९ हजार ९८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रविण वसंत सपकाळे (वय ४४, रा. भोलाणे ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
जळगाव शहरातील चित्रा चौकात २ जानेवारी कापड दुकानातून फोडून ८ हजारांची रोकड लांबविली होती. त्यानंतर पुन्हा ६ जानेवारी पोलनपेठ येथील पॉप्युलर ट्रेडर्स, योगेश प्रोव्हिजन, आणि तिरुपती हेअर आर्ट अशी तीन दुकाने फोडून मुद्देमाल चोरून नेला होता. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, आरोपी प्रविण सपकाळे याला अंजिठा चौफुली येथून अटक करण्यात आली आहे.
चोरीची रक्कम जप्त
संशयित आरोपीवर यापूर्वी घरफोडीचे तीन गुन्हे दाखल आहेत. त्याने चोरीची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून १८ हजार ९८० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपीला जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई :
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार राजेश मेढे, संजय हिवरकर, अतुल वंजारी, पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील, हरीलाल पाटील, आणि प्रदीप चवरे यांनी सहभाग घेतला.