जळगाव प्रतिनिधी । शहरातील मास्टर कॉलनीत गस्त घालत असतांना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील सराईत गुन्हेगाराला चोरीच्या दुचाकीसह अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी औरंगाबाद पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मजहर शेख गुलाम वय २२ रा. जवाहर नगर, औरंगाबाद असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने औरंगाबाद जिल्ह्यातील आसेगाव येथून दुचाकी चोरीची चोरल्याची कबूली दिली.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील आसेगाव येथील भाऊसाहेब शाहुबा पल्हाळ वय ४८ हे मजूरी करतात. त्यांची घरासमोर उभी एम.एच.२० एफ.एल. ९८८५ या क्रमाकांची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना ६ एप्रिल रोजी समोर आली होती. याप्रकरणी औरंगाबाद शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. ही दुचाकी संशयित मजहर शेख गुलाम याने लांबविल्यानंतर याच दुचाकीवरुन मजहर गुलाम हा जळगावात आला. मास्टर कॉलनीत फिरत असतांना गस्त घालणार्या एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील, गणेश शिरसाळे यांच्या पथकाने मजहर यास अटक केली. त्यास पोलीस ठाण्यात आणून खाकीचा हिसका दाखविल्यावर त्याने औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून दुचाकी आसेगाव येथून चोरली असल्याची माहिती दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी औरंगाबाद शहर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. औरंगाबाद पोलिसांनी आज सायंकाळी जळगाव गाठून संशयित मजहर यास ताब्यात घेतले. संशयित मजहर याच्यावर औरंगाबादमधील जवाहर नगर, उस्मानपुरा यांच्यासह अहमदनगर, वैजापूर याठिकाणी अनेक घरफोडीचे व इतर गुन्हे दाखल आहेत. .