मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील आठ लाख लाभार्थी महिलांना यापुढे दरमहा फक्त ५०० रुपयेच मिळणार आहेत. यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्य शासनाने यावर्षी नमो शेतकरी योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी केली असता आठ लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याचे उघड झाले. यानुसार, एकाच लाभार्थ्याला दोन सरकारी योजनांचा दुहेरी लाभ मिळणार नाही, या अटीमुळे आता त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा अपूर्ण हप्ता – म्हणजेच केवळ ५०० रुपयेच मिळणार आहेत.
नमो शेतकरी योजनेत महिलांना दरवर्षी ६,००० रुपये मिळतात. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधीमधूनही त्यांना ६,००० रुपये मिळतात. एकूण मिळकत १२,००० रुपये झाल्यामुळे त्यांना आता लाडकी बहीण योजनेतून फक्त राहिलेली शिल्लक रक्कम म्हणजे ५०० रुपये प्रति महिना मिळणार आहे. राज्य सरकारने २०२३ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या धर्तीवर ‘नमो महासन्मान निधी योजना’ सुरु केली होती. या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत वार्षिक ६,००० रुपये म्हणजे दर चार महिन्यांनी २,००० रुपये बँक खात्यात थेट जमा होतात.
लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा १०वा हप्ता येत्या ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खात्यात जमा केला जाणार आहे. मात्र नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना या वेळी केवळ ५०० रुपयेच मिळणार आहेत. आतापर्यंत योजनेचे ९ हप्ते वितरित झाले असून, आता ही कपात महिलांमध्ये नाराजीचे कारण ठरू शकते. राजकीय वर्तुळात या निर्णयावरून सरकारवर टीका होत असून, लाभार्थी महिलांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.